नांदेड: उमरखेड नगर परिषदेला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार; १० कोटींचा धनादेश सुपूर्द | पुढारी

नांदेड: उमरखेड नगर परिषदेला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार; १० कोटींचा धनादेश सुपूर्द

उमरखेड: पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत मुंबईतील नरिमन पॉईंट येथे नुकताच नगर विकास दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उमरखेड नगर परिषदेला सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर यांना पुरस्कार देण्यात आला.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 अंतर्गत नगरपरिषदेने शहरात केलेल्या विविध सौंदर्यकरण कामाचे व राबविलेल्या स्वच्छता अभियानाची प्रत्यक्ष पाहणी करून शासन स्तरावर तसा अहवाल सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने अशा तीनही प्रवर्गात राज्यस्तरावरून तीन-तीन बक्षिसे जाहीर केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना पुरस्कार व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

उमरखेड नगर परिषदेला ‘ब’ वर्ग नगर परिषदेमधून राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व १० कोटींचा धनादेश देऊन गौरविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अभियंता, सफाई कामगार व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा 

Back to top button