अजिंठा(छत्रपती संभाजीनगर), पुढारी वृत्तसेवा : अजिंठा परिसरात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची लावण्यासाठी कंबर कसली आहे. शेतक-यांना मिरची लागवडीतून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते.
अजिंठा, आनाड, बाळापूर, पिंपळदरी, गोळेगांव , धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी , बोधवड, खंडाळा, वसई, अंभई, उडणगांव, आदी भागांतील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची सुरू आहे. सध्या शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
मल्चिंग पेपरच्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल अखेर व मे महिन्यात लागवड करतो. या पिकासाठी शेतकऱ्यांनी पाणी राखून ठेवले आहे. या वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिकचा भर आहे. मागील वर्षी जवळपास सहा ते सात हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती.
यंदा ही वाढ होण्याची शक्यता आहे. कापुस, सोयाबीन, सुर्यफुल पिकांना योग्य भावा मिळाला नाही. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. दरवर्षी शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची लागवडीकडे वळला आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न मिरचीतून निघत आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे मिरची पीक खराब झाले होते त्यामुळे मिरचीतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. यंदा मात्र मागील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी मिरची लागवडीचे नियोजन करीत असून परिसरात विविध रोपवाटिकेतून विविध कंपनीची रोपे बुक करीत आहेत.
योग्य भाव मिळेल या आशेवर चार वर्षांच्या तुलनेत यंदा पेरणी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी एप्रिलपासून पाण्याच्या उपलब्धेनुसार मिरची लागवड करीत आहेत. शेततळी, ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर या आधुनिक शेती पद्धतीमुळे यावर्षी चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
– शेतकरी
.हेही वाचा