नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावती अकोला जिल्ह्यातील सुमारे ६९ गावांचा पाणी प्रश्न घेऊन ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख नागपुर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाच्या आंदोलनासाठी शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यासह उद्या गुरुवारी (दि. २० एप्रिल) सकाळी १० वाजता नागपुर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.
अमरावती अकोला जिल्ह्यातील सुमारे ६९ गावांचा पाणी प्रश्न घेऊन आमदार देशमुख नागपुरला जाणार आहेत. पाणी पिण्याच्या योग्यच नाही. मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार देशमुख थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर हा गावागावातून गोळा केलेला पाण्याचा टँकर घेऊन पोहोचणार आहेत. फडणवीस यांनी हे पाणी पिऊन दाखवावे अशी अफलातून अट त्यांनी ठेवली आहे. पालकमंत्री फडणवीस यांनी या सर्व गावांच्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी घेऊन २० एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानासमोर धडक देणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. नागपूर जिल्ह्यातील अमरावती मार्गावरील वाडी वडधामना हनुमान मंदिर येथे शहर आणि ग्रामीणचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामार्फत आमदार देशमुख आणि त्यांच्या सोबत आलेल्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.