नरसीफाटा; पुढारी वृत्तसेवा : नायगांव तालुक्यातील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटामधील १९६० पासूनचे उपलब्ध असलेले सर्व रेकॉर्ड, शिक्षकांचे सेवा पुस्तक जाळून टाकण्यात आले. ही धक्कादायक घटना आज (दि. १५) सकाळी शिक्षक शाळेत आल्यावर उघडकीस आली. या घटनेमुळे गावकरी, शिक्षण विभाग आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायगांव तालुक्यातील वंजारवाडी येथे १ ते ७ पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. येथे ८५ विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी (दि.१४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून शिक्षक शाळेतून निघून गेले. मात्र, रात्री अज्ञात व्यक्तीने शाळेतील कार्यालयाचे कुलुप उचकटून दरवाजा उघडला. व सन १९६० पासून शाळेत असलेली पाच कपाट फोडून कपाटातील विद्यार्थ्यांचे निर्गम रजिस्टर, शिक्षक – विद्यार्थी हजेरी पट, परीक्षेचे पेपर, शिक्षकांच्या सेवा पुस्तिका, अन्य रेकॉर्ड दुस-या खोलीत नेवून जाळण्यात आले.
ही घटना समजताच नागरिकांनी शाळेत एकच गर्दी केली. याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिली. गटशिक्षणाधिकारी काकडे, केंद्र प्रमुख उद्धव ढगे व पोलीस जमदार कुमरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
ही घटना घडवून आणण्यासाठी यामध्ये अनेक जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिक्षक त्यांची सेवा पुस्तिकेची मूळ कॉपी सोमवारी (दि. १७) घेऊन जाणार होते. परंतु त्यांच्या सेवापुस्तिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांसह गावकरी, शिक्षण विभागात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा