नांदेड रेल्वे विभागाने तिकीट तपासणीतून वसूल केले ९.५ कोटी रुपये | पुढारी

नांदेड रेल्वे विभागाने तिकीट तपासणीतून वसूल केले ९.५ कोटी रुपये

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत तिकीट विरहित प्रवास आणि अनियमित प्रवासाला अटकाव करण्यात तिकीट तपासणी महत्त्वाची भूमिका बजावते आणि विनातिकीट प्रवाशांवर प्रतिबंधक प्रभाव म्हणून काम करते. तसेच तिकीट तपासणीमुळे रेल्वेच्या बुकिंग विंडो विक्रीत वाढ होण्याचा मार्ग मोकळा होतो.

नांदेड रेल्वे विभागात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.73 लाख केसमधून (विना तिकीट/अयोग्य तिकीट) 9.5 कोटीं रुपयांची वसुली केली आहे. तिकीट तपासणीमधील नांदेड विभागाची ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. 2022-23 या वर्षात नांदेड रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी 75 विशेष तिकीट तपासणी मोहिम तर दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्यालायीन अधिकार्यांनी नांदेड विभागात दोन तिकीट तपासणी मोहिम राबविल्या. ज्यामध्ये वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नांदेड नागेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वात दिनांक 3 मार्च रोजी एका दिवसात 5.58 लाख रुपयांची वसुली केली. ही नांदेड विभागातील आज पर्यंतची सर्वाधिक वसुली आहे.

तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांसह तिकीट वेंडिंग मशिनद्वारे तिकिट काढण्यात सुलभता आणि UTS ON MOBILE अॅपचा प्रसार इत्यादी उपायांमुळे रेल्वेला प्रवासी व्यवसायातील कमाई सुधारण्यास मदत झाली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी संपूर्ण वाणिज्य शाखेचे अभिनंदन केले. श्रीमती सरकार यांनी सांगितले की, तिकीट तपासणी ही महत्त्वाची यंत्रणा आहे जी ट्रेनमधील अनधिकृत प्रवास कमी करण्यास मदत करते आणि नियमित रेल्वे प्रवाशांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते.

हेही वाचा;

Back to top button