हिंगोली : महावितरणच्या गलथान कारभारामुळे आडगाव येथील ग्रामस्थ त्रस्त | पुढारी

हिंगोली : महावितरणच्या गलथान कारभारामुळे आडगाव येथील ग्रामस्थ त्रस्त

आडगाव रंजे; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे मागील काही दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून गावकरीही त्रस्त झाले आहेत. महावितरणाने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून आडगाव येथील वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकित होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावामध्ये सक्तीची वसुली करून गावकऱ्यांकडून वीज बिल वसूल केले. परंतु वीज बिल भरूनही परिस्थिती पूर्वीसारखीच असल्याने  महावितरणच्या कारभाराला ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत. अवकाळी पाऊस झाला की अनेक तास वीजपुरवठा खंडीत केला जातो. ही परिस्थिती दररोजची झाली आहे. ‘पाऊस येतो तासभर आणि लाईट जाते रातभर’ अशीच काहीशी परिस्थिती आडगाव येथे निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पिठाच्या गिरण्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. शेतामध्ये उन्हाळी सोयाबीन, भुईमूग, मुग आदी पिके शेतकरी घेतात परंतु वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांचे भविष्य हे धोक्यात आले आहे.

आडगाव रंजे येथील शाळा अत्यंत नावाजलेली असून येथे उन्हाळाभर प्रत्येक इयत्तेच्या शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षा इत्यादींच्या बॅचेस चालू असतात. दररोज सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सतत बॅच चालू असतात परंतु लाईट नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिमाण होत आहे. दरम्यान, हा वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांमधून होत आहे.

         हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button