सातारा : वळवाने झोडपले, गारांचा खच; जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी | पुढारी

सातारा : वळवाने झोडपले, गारांचा खच; जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यापासून वळवाचा पाऊस जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसत आहे. शुक्रवारी वळवाने सातारा शहरासह जिल्ह्याला झोडपले. विजांचा लखलखाट, ढगांच्या कडकडाटासह दुपारी 4 च्या सुमारास वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागरिकांसह भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वादळी वारा व गारांसह पाऊस पडल्याने सुगीची कामे खोळंबली.

गेल्या काही दिवसांपासून वळवाच्या पावसाचे सावट जिल्ह्यावर घोंगावत आहे. ढगाळ हवामान, कधी कडक ऊन, कधी पावसाची भुरभूर, उकाडा अशा विचित्र हवामानाचा सामना जिल्हावासीय करत आहेत. शुक्रवारी दिवसभर कडक ऊन व आभाळ निरभ्र होते. दुपारनंतर अचानक वातावरणाचा नूर पालटला. अचानक आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरु होता. दु. 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्‍यासह सुमारे अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या. या पावसात काही प्रमाणात गाराही पडल्या. जोरदार पावसामुळे वाहनधारकांनाही पुढचे काही दिसेनासे झाल्याने वाहने जागेवरच थांबावली होती. त्यामुळे पावसाचा जोर आसरेपर्यंत रस्त्यावरील वाहतूकी रोडावली होती. संगमनगर परिसरात वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली. कैलास स्मशानभूमीमध्ये वार्‍याने झाड पडले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये झाडांवर वीज पडण्याच्या घटनांमुळे वीजांच्या कडकडाटाने नागरिक भयभित झाले होते. बाजारपेठेत नागरिकांसह फिरते विक्रेते, भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी आपले साहित्य आहे तिथेच प्लास्टिकने झाकून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. वार्‍यामुळे काही ठिकाणी प्लास्टिक आवरणच उडाल्याने भाजी भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. पावसामुळे रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट झाला होता.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका, रॅलींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये काहीसा विस्कळीतपणा आला. मात्र थोड्याच वेळात वातावरण पूर्ववत झाल्याने भीमप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडत मिरवणुका काढल्या.

ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतशिवारामध्ये पिकांची काढणी, कापणी, मळणीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. या सुगीवर अवकाळीचे सावट घोंगावत आहे. शुक्रवारी दुपारी अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सुगीच्या कामांचा खोळंबा झाला. ज्वारीची काटणी केलेली कणसे झाकण्याचीही उसंत न मिळाल्याने ती भिजली. तर काहींची मळणी केलेले धान्य झाकण्यासाठी त्रेधा उडाली. सातारा तालुक्यातील काही भागात गारांसह पाऊस पडल्याने फळबागांचे नुकसान झाले. सध्या हंगामी आंबा तयार होत असून वादळी वार्‍यामुळे बहुतांश फळे गळून पडत आहेत. तर वाचलेल्या फळांना गारांच्या मार्‍यामुळे नुकसान होणार आहे. आंबा उत्पादनाला गारांचा फटका बसणार आहे.

Back to top button