हिंगोली : नर्सी नामदेव संस्थानच्या सहा कोटींच्या अपहारप्रकरणी स्वयंघोषित अध्यक्षावर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : नर्सी नामदेव संस्थानच्या सहा कोटींच्या अपहारप्रकरणी स्वयंघोषित अध्यक्षावर गुन्हा दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : नर्सी नामदेव संस्थान येथील संत नामदेव देवस्थानचे स्वयंघोषित अध्यक्ष सतीश विडोळकर यांनी दहा वर्षाच्या काळात सहाय्यक धर्मदाय यांची परवानगी न घेता कोट्यावधी रूपयांचा खर्च केला. दहा वर्षाच्या काळात साधारण सहा कोटींच्या रकमेची नोंद व्यवस्थित न ठेवल्याने त्यांच्याविरूद्ध सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त यांच्या आदेशावरून आंबादास गाडे यांच्या तक्रारीवरून ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

३ नोव्हेंबर २०१६ मध्ये आंबादास सुकाजी गाडे, भिकाजी भिमाशंकर किर्तनकार, भागवत रामराव सोळंके यांनी धर्मदाय आयुक्‍तांकडे अर्ज दाखल केला होता. तात्पुरत्या स्वरूपात विश्‍वस्त असलेल्या सतीश नरहरराव विडोळकर यांच्यासह इतर पाच जणांची संस्थानचे काम पाहण्यासाठी नियुक्‍ती करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दैनंदिन काम पाहण्यासाठी तात्पुरती नियुक्‍ती केली असून त्यांना कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. असे असताना सतीश विडोळकर यांनी स्वतः संस्थानचा अध्यक्ष आहे, असे भासवून नामदेव संस्थानच्या नावाने असलेली जागा जिचा घर क्रमांक ८६ आहे. त्यांनी परस्पर पैसे घेऊन दानपत्र दिले. नामदेव संस्थानच्या धर्मशाळेच्या खिडक्या व ग्रील काढून नेले त्यावेळी त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

संस्थानच्या ताब्यातील लोखंडी भंगार व प्लास्टिक भंगार परस्पर विक्री करणे, देवस्थानला देणगी स्वरूपात आलेले धान्य परस्पर विक्री करणे, स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून प्रसिद्धीसाठी बुकलेट, बॅनर, पोस्टर इत्यादींवर लाखो रूपये खर्च करणे, अशा अनेक तक्रारी त्याच्याविरूद्ध आल्या होत्या. तसेच पंढरपूरच्या जागेच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रक्‍कम जमा केली. त्यातही बेहिशोबी खर्च केला.

कोट्यावधींचा खर्च केला असताना त्यांनी धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाची कुठलीही परवानगी घेतली नाही. यासह इतर बाबतीत त्याच्यांविरूद्ध तक्रार आली होती. यावरून सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त रविंद्र धायतडक यांनी नर्सी पोलीस ठाण्याला निर्देश दिले. त्यानुसार ६ कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी आंबादास गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सतीश विडोळकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

                हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button