

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल 182 उमेदवारी अर्जांपैकी अर्ज पडताळणीत 155 अर्ज वैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी ही माहिती दिली. अर्ज माघारीचा अंतिम दिवस गुरुवार (दि.20) असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संचालक मंडळात एकूण 18 संचालक, कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय संस्था (सोसायटी) सर्वसाधारण उमेदवार 7 जागांसाठी 63 अर्ज, महिला राखीव 2 जागांसाठी 15 अर्ज, इतर मागास प्रवर्ग 1 जागेसाठी 10 अर्ज, अनुसूचित जमाती 1 जागेसाठी 8 अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण 2 जागांसाठी 26 अर्ज, अनुसूचित जाती जमाती 1 जागेसाठी 8 अर्ज, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागेसाठी 7 अर्ज, अनुज्ञप्तीधारक व्यापारी व अडत मतदारसंघ 2 जागांसाठी 10 अर्ज, हमाल व तोलारी 1 जागेसाठी 8 अर्ज असे एकूण अखेर 155 अर्ज वैध ठरले.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे अर्ज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम, वसंत भालेराव ,गोविंद खिलारी, शिवाजी ढोबळे, गणपत इंदोरे, विजय काळे, अशोक शेगाळे, नीलकंठ काळे, सोमनाथ काळे, रत्ना गाडे, बाळासाहेब मेंगडे, रमेश खिलारी आदींचे प्रमुख अर्ज वैध ठरले आहेत. मतदान शुक्रवारी (दि.28) होणार असून मतमोजणी शनिवारी (दि.29) होणार आहे.