हिंगोली : पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची जिल्हाभरात चर्चा; अंधश्रद्धा नव्हे योगा… | पुढारी

हिंगोली : पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची जिल्हाभरात चर्चा; अंधश्रद्धा नव्हे योगा...

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोत्रा येथे हरिनाम व संगीत भागवत सप्ताहासाठी ग्रामस्थांनी हभप हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना यंदा पाचारण केले. हे बाबा रोज किर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग दाखवितात. किर्तनापेक्षा जास्त गर्दी त्‍यांच्या या पाण्यावर तरंगण्याच्या प्रयोगाला अधिक होत असल्‍याचे दिसून येत आहे.

धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची ६ एप्रिल रोजी सांगता होणार आहे. हरिभाऊ महाराज व त्यांची पत्नी सुमनबाई यासाठी ज्ञानेश्वरीचे प्रवचन करायला आले आहेत. मात्र हरिभाऊ रोज शेत शिवारात जाऊन विहिरीतील पाण्यावर तरंगून मंत्रोच्चार करतात. तर बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात, असे भक्त सांगत होते.

शिवाजी कनिराम जाधव यांच्या शेतातील विहिरीवर हरी महाराज यांनी पाण्यावर तरंगत राहण्याचा प्रयोग करून दाखविला. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. वेद व ग्रंथ वाचनामुळे मला ही विद्या प्राप्त झाल्याचे हरिभाऊ महाराज सांगतात. त्याला योगाचाही आधार असल्याचे ते म्हणतात. मात्र यातून ते लोकांना फसवण्यासाठी किंवा अंधश्रद्धेची बीजे रोवण्यासाठी काही करीत नाहीत.

यावेळी हरिभाऊ महाराज यांना पाण्यावर तरंगताना पाहून हात जोडून उभे राहणारे भक्त गर्दी वाढताच चलबिचल करत होते. ही गर्दी इतर दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू नये, याची काळजी ग्रामस्थांनीच घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी याबाबतचे काढलेले व्हिडीओही परिसरात व्हायरल होत असून, यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

Back to top button