छत्रपती संभाजीनगर : सरपंचाने उधळल्या २ लाखांच्या नोटा; जाणून घ्या काय आहे कारण | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : सरपंचाने उधळल्या २ लाखांच्या नोटा; जाणून घ्या काय आहे कारण

 फुलंब्री । पुढारी वृत्तसेवा :  फुलंब्री (Chhatrapati sambhaji nagar) येथील पंचायत समितीमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना टक्केवारीनुसार लाच दिल्याशिवाय होत नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या सरपंचाने पंचायत समिती आवारात नोटांची माळ घालून या नोटांची उधळण केली. ‘अधिकाऱ्यांनो, हे घ्या पैसे, आता तरी काम करा’ असा टाहो फोडीत आंदोलन केले. जवळपास २ लाखाच्या नोटांची उधळण या सरपंचाने केली. याप्रकरणी तत्काळ दखल घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओ याना बडतर्फ केल्याचे माध्यमांवर सांगितले. (Chhatrapati Sambhaji nagar)

‘अधिकाऱ्यांनो, हे घ्या पैसे, आता तरी काम करा’

गेवराई (पायगा) येथील सरपंच मंगेश साबळे यांनी बऱ्याच दिवसांपासून गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी व इतर अनुदानित लाभाच्या योजनेसाठी सर्व दस्तवेज दिले. मार्च अखेर असल्याने चार दिवसांपासून या कामासाठी सतत चकरा मारल्या. त्यावेळेस बीडीओ यांनी विहिरीचे ४ लाख अनुदान पाहिजे असतील तर १२ टक्के रक्कम मला द्यावी लागेल. यानंतर अभियंता व कारकून यांनी १५ टक्क्यांची मागणी केली. टी.एससाठी २ टक्के. जी.ओ टॅगिंगसाठी १ हजार, असे ६० ते ७० हजार रुपये सिंचन विहिरीसाठी मागितले. त्यांचे हे भाव ठरलेले आहेत. यात दलालही दिवसभर फाईल दाखल करतात. यामुळे सरपंच मंगेश साबळे यांचा माथाच फिरला व त्यांनी शुक्रवारी पंचायत समिती आवारात अनोखे आंदोलन करून नोटांची उधळण केली. पंचायत समितीच्यज्ञा द्वारासमोर गळ्यात असलेल्या माळेतील एक एक नोटाचे बंडल घेऊन अधिकऱ्यांच्या नावे त्यांनी नोटांची उधळण केली. यामध्ये ५००, २००, १००, ५०, २०, अशाप्रकारच्या नोटा होत्या.

या अगोदरही २ बीडीओंना असेच घरी जावे लागले होते. यात शिवाजी माने हे निलंबित झाले होते. तर विलास गंगावणे यांच्यावर अशीच कारवाई होऊन चौकशी सुरु असताना ते ३१ डिसेंबर २१ रोजी निवृत्त झाले. दरम्यान, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्त वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत संगीतले की, या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी फुलंब्री पंचायत समितीचे बीडीओ यांना बडतर्फ करीत असल्याचे जाहीर केले. यामुळे या निर्णयाचे मंगेश साबळे व तालुकतील शेतकरी लोकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, नोटा उधळणे गुन्हा असेल तर बारमध्ये बारबालांवर नोटांची उधळण होते, यावर कधी गुन्हे दाखल झाले आहेत का? असा प्रश्न साबळे यांनी केला आहे.

पोलिसात अब्रूनुकसानीची तक्रार

साबळे यांच्यावर गुन्हा दाखल बीडीओ ज्योती कवडदिवे यांनी पोलिसात अब्रूनुकसानीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार मंगेश साबळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. यावेळी • पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते. मात्र त्यांच्यातदेखील याप्रकरणी कुजबुज चालू होती. तर दुसरीकडे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनाची जातीने दखल घेऊन बीडीओंना बडतर्फ केले. त्यामुळे गुन्- हेगार कोण? मंगेश साबळे की बीडीओ, असा प्रश्न विचारल्या जात आहे.

Chhatrapati Sambhaji nagar: नोटा लोक जमा करून घेऊन गेले

‘अधिकाऱ्यानो, हे घ्या पैसे, आतातरी गरीब शेतकऱ्यांची कामे करा’, अशा प्रकारच्या घोषणा साबळे देत होते. प्रवेशद्वारासमोर दूरपर्यंत नोटा उडत होत्या. हे पाहण्यास आजूबाजुचे लोक जमा झाले होते. एवढ्या मोठ्या रकमेची साबळे यांनी उधळण केली, मात्र या नोटांकडे त्यांनी पाहिलेदेखील नाही. यामुळे जमा असलेल्या सर्व लोकांनी या नोटा ज्याच्या हातात पडल्या त्या जमा करून घेऊन गेले.

हेही वाचा 

Back to top button