

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये धान्य चोरी करणार्या अंतरराज्य टोळीतील तिघांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. २९) अटक केली. त्यांच्याकडून 40 क्विंटल सोयाबीन, 12 क्विंटल हरभरा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून धान्य चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर उत्तरप्रदेशातील दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे दोन तर कोठारीफाटा येथील एक भुसार दुकान फोडून चोरट्यांनी सोयाबीन व हरभर्याचे पोते पळविल्याची घटना घडली होती. आखाडा बाळापूरात सलग दोन दिवसांत दोन घटना घडल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार भगवान आडे, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, सुमीत टाले, आकाश टापरे, प्रमोद थोरात यांचे पथक स्थापन केले होते.
या पथकाने मागील चार दिवसांत मराठवाडयात विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली. त्यापैकी दोघे जण नांदेड जिल्हयातील दुधडवाडी व वायफना येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या पथकाने दुधडवाडी येथील परमेश्वर उर्फ बाबु रामु गायकवाड, वायफना येथील माधव मसाजी पवार तसेच शिवमंगल मिश्रा (रा. उत्तरप्रदेश) यांना अटक केली.
दरम्यान, या प्रकरणातील शफायत चौधरी उर्फ इरफान, शेर मोहमद (रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. भिवंडी, मुंबई) या दोघांचाही या गुन्हयात सहभाग असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. त्यांच्याकडून राज्यासह इतर राज्यातील धान्य चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांची चौकशी सुरु केली आहे.
हेही वाचा