उस्मानाबाद : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेतेमंडळींच्या बैठका सुरू | पुढारी

उस्मानाबाद : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेतेमंडळींच्या बैठका सुरू

परंडा, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी परंडा तालुक्यातील नेते मंडळींनी बैठकांचा सपाटा लावला आहे. अनेकांची वेगवेगळी खलबते सुरु झाल्याने यंदाची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. परंडा तालुका कृषी उत्पन्न समितीवर सर्वच राजकीय पक्षांनी वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर तालुक्यात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या निवडणुकीसाठी मैदानात कोण असणार यासोबतच आमचं ठरणार की विस्कटणार याकडे मतदारांसह जनतेचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीचे एकूण १३७१ मतदार १८ संचालक निवडून देणार आहेत. यात हमाल मापडी या एकाच मतदारसंघात फक्त ४४ मतदार आहे. सोसायटी मतदारसंघातून ६६५ मतदार ११ संचालक निवडून देणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा महिलांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी एक जागा आरक्षित आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून ५७७ मतदार ४ संचालक निवडून देणार आहेत. व्यापारी आडते मतदार संघातून ८५ मतदार २ संचालक निवडून देणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, भाजपा, या राजकीय पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्तेही इच्छुक आहेत. त्यांनी प्रारुप यादीनुसार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. पक्षात चुरस वाढल्याने अधिकृत पॅनेलपेक्षा बंडखोरीला वरिष्ठांची फूस असल्याचेही काही इच्छुकांकडून मतदारांमध्ये बिंबवले जात असल्याची माहिती आहे. या सर्व धामधुमीत मताचा भाव हजारोपर्यंत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बाजार समिती निवडणूक कार्यक्रम असा : २७ मार्च – उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत,  २७ मार्च ते ३ एप्रिल – उमेदवारी अर्जांची छाननी, ५ एप्रिल – वैध उमेदवारी अर्जांची यादी, ६ एप्रिल – अर्ज माघारीची मुदत, ६ ते २० एप्रिल – अंतिम यादी आणि चिन्हवाटप, २१ एप्रिल –  मतदान, २८ एप्रिल – मतमोजणी

 हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button