

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील कुरुंदा – गिरगाव मार्गावरील खाजमापूरवाडी शिवारामध्ये पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात पडून दोन तरूणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २८) रात्री ९ च्या सुमारास घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. केदार विलास रायवाडे व परमेश्वर विश्वनाथ बुरपुटे (रा. गिरगाव) असे मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील गिरगाव येथील केदार रायवाडे व परमेश्वर बुरपुटे दुचाकीवरून सोमवारी सायंकाळी कुरुंदा येथे गेले होते. त्या ठिकाणी काम आटोपून रात्री दोघेही परत गावाकडे निघाले होते. दरम्यान, पुलाच्या बांधकामासाठी खोदलेला खड्डा अंधारात न दिसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बांधकामावरील मजूर कामावर आले असता त्यांना खड्ड्यात दोघांचे मृतदेह दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आमले, बालाजी जोगदंड, वाबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तसेच गिरगाव येथील गावकरी घटनास्थळी दाखल झाले. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकर्यांनी केला. खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्यामुळेच हा अपघात झाल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय काम चालू करू देणार नाही, अशी भूमिका गावकर्यांनी घेतली. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी गावकर्यांची समजूत काढल्यानंतर दुपारी एक वाजता खड्ड्यातील पाणी काढण्यात आले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमत येथे पाठविण्यात आले आहेत. कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा