जालना : मदतीसाठी आलेल्या पोलिसांवर दोघा भावांचा हल्ला | पुढारी

जालना : मदतीसाठी आलेल्या पोलिसांवर दोघा भावांचा हल्ला

जालना; पुढारी वृत्तसेवा : डायल ११२ क्रमांकावर कॉल आल्याने कॉल करणाऱ्याच्या मदतीसाठी गेलेल्या पोलिसांवर दोघा भावांनी हल्ला केल्याची घटना जुन्या जालन्यात शास्त्री मोहल्ल्यात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी एक हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा फरार आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याची परिसरात पसरली आहे.

जुन्या जालन्यातील शास्त्री मोहल्ल्यात सोमवारी (दि.२७) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने डायल ११२ क्रमांकावर कॉल करून आपल्या मुलास व बहिणीच्या मुलास काही व्यक्ती मारहाण करीत असल्याचे सांगून मदतीची याचना केली. यावेळी रात्रगस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी मुकेश पठ्ठे हे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत तेथील वाद मिटविला व दोन्ही गटाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

पोलीस कर्मचारी मुकेश पठ्ठे हे घटनास्थळाचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते. तेवढ्यात तेथे असलेले गणेश रामभाऊ गोगडे आणि त्याचा भाऊ श्याम उर्फ बबन रामभाऊ गोगडे यांनी मुकेश पठ्ठे यांच्या हातातील मोबाईल हिसकावत त्यांना मज्जाव केला. दरम्यान त्यांच्यावर हल्ला करत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. नंतर हा वाद वाढत गेला. दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत शाम उर्फ बबन यास ताब्यात घेतले. तर गणेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला.

याप्रकरणी जालना पोलिसांनी या दोघा भावाविरुद्ध भादंवि. ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि. महादेव चव्हाण हे तपास करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button