नांदेड : मोटरसायकल चालवायला देत नसल्याच्या कारणावरून मुलाने केला वडिलांचा खून  | पुढारी

नांदेड : मोटरसायकल चालवायला देत नसल्याच्या कारणावरून मुलाने केला वडिलांचा खून 

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : मोटरसायकल चालवायला का देत नाही, या कारणावरुन मुलाने बापाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) कैलासनगर बेलखेड (ता.उमरखेड) येथे घडली. संजय तुकाराम राठोड (वय ४५) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर राहुल संजय राठोड (वय २५) असे मुलाचे नाव आहे.  मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलासनगर बेलखेड येथील रहिवासी संजय राठोड यांचा मुलगा राहुल याच्याशी मंगळवारी रात्री वाद झाला. आपण मला मोटरसायकल चालवायला का देत नाही, मी तुमचा पोटचा मुलगा नाही का ?, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही, लहान मुलगा अतुल यांच्यावरच तुम्ही खूप प्रेम करता व त्यालाच मोटर सायकल चालवायला देता, असे म्हणत राहुलने रागाच्या भरात भाजी कापण्याच्या सुरीने वडिलांच्या मानेवर वार केला. यात वडील गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार  मृत संजय यांची पत्नी आशाबाई  राठोड यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली. संशयित राहुल याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली  एपीआय प्रशांत देशमुख करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button