नांदेड : मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची 26 तारखेला लोहा येथे जाहीर सभा | पुढारी

नांदेड : मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची 26 तारखेला लोहा येथे जाहीर सभा

लोहा; पुढारी वृत्तसेवा : विकासाच्या तेलंगणा मॉडेलचे जनक भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची रविवार दि. 26 मार्च रोजी लोहा येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी बोलताना माजी आ.धोंडगे म्हणाले की, सरकारच्या शेतकरी विरोधी व उदासीन धोरणामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी व तरूणवर्ग सध्या हैराण झाला आहे. पण शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व मागासवर्गीय समाजासाठी राबविलेल्या धोरणांमुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे.

महाराष्ट्रातही तेलंगणाच्या धर्तीवर येथील समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा शेतकर्यांना संघटीत करणार असल्याचे यावेळी धोंडगे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले तेलंगणा मॉडेल कसे आहे, हे येथील जनतेला माहित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे रविवार दि. 26 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सभेस एक लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास यावेळी धोंडगे यांनी व्यक्त केला. यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिवराज धोंडगे ,माजी सभापती संजय कर्हाळे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

Back to top button