बारामती : यात्रेतील वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला | पुढारी

बारामती : यात्रेतील वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : यात्रेतील तमाशाचा कार्यक्रम आटोपून घराकडे जाताना मोटारीचा दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून पाच जणांनी युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव कडेपठार (ता. बारामती) येथे घडली.
माळेगाव पोलिस ठाण्यात याबाबत उमेश लक्ष्मण ताम्हाणे (वय 33, रा. जळगाव कडेपठार) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी बंडा काशीद, अक्षय घोलप (रा. मेडद, ता. बारामती), इंद्रजित सोनवणे (रा. कर्हावागज, ता. बारामती), एक्का (पूर्ण नाव नाही) व अन्य एक अनोळखी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला. दि. 19 रोजी रात्री जळगावातील पिरबाबा यात्रेतील पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. जखमी ताम्हाणे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गावातील यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम असल्याने फिर्यादा हा चुलत भाऊ अमोल सुभाष ताम्हाणे, मित्र सचिन खोमणे याच्यासह पाहण्यासाठी गेले होता. संशयित आरोपी हे मोटारीतून आले होते. मध्यरात्री तमाशाचा कार्यक्रम संपल्यावर फिर्यादी घरी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी त्यांचा मित्र वैभव ताम्हाणे याच्याकडून मोटार बाहेर काढताना एका दुचाकीला धक्का बसला. त्या वेळी तेथे वरील पाच जण जमा झाले. फिर्यादीने त्याला मारू नका, तो आमच्या भावकीतील आहे, असे सांगितले. त्यावर या पाच जणांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.

काशीद याने धारदार हत्याराने डोक्यावर, पाठीवर, कमरेवर वार केला. इतर आरोपींनीही त्यांच्याकडील हत्याराने वार केले. त्या वेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर चुलत भाऊ अमोल व मित्र सचिन खोमणे यांच्यासह इतरांनी त्यांची सुटका केली. तसेच उपचारासाठी रुग्णालयात
दाखल केले.

Back to top button