बीड: पिंपळनेर येथे गुटख्यासह ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड: पिंपळनेर येथे गुटख्यासह ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीमध्ये घोडका राजुरी शिवारातील गोदामावर छापा टाकून गुटख्यासह 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा विक्री करणारा महारुद्र मुळे (रा. घोडका राजुरी) व सत्यप्रेम घुमरे‌ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाळासाहेब वरेकर फरार झाला आहे. ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेने आज (दि. २१) पहाटे ५ च्या सुमारास केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड -परळी महामार्गावरील घोडका राजुरी शिवारात असणाऱ्या गोदामातून गुटख्याची अवैध मार्गाने विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी आज पहाटे गोदामावर छापा टाकला. यावेळी ९४ भोते गुटखा व ९४ तंबाखूच्या गोण्या आणि चारचाकी असा सुमारे ५२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ, पीएस‌आय भंगतसिग दुलत, पोलीस कर्मचारी मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, नारायण कोरडे, अशोक कदम, अतुल हराळे यांनी केली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button