बीड : ऊस तोडणीस येण्यास नकार देणाऱ्या मजुराचा काठेवाडी येथे खून | पुढारी

बीड : ऊस तोडणीस येण्यास नकार देणाऱ्या मजुराचा काठेवाडी येथे खून

धारूर; पुढारी वृत्तसेवा : कामावर येण्यास नकार देणाऱ्या ऊसतोड मजुराचा खून केल्याची घटना धारूर तालुक्यातील काटेवाडी येथे घडली. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी घडलेल्या घटनेत ट्रक चालक व मुकादमाविरोधात धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीराम अण्णासाहेब कसबे (वय ४५ वर्षे रा.सोन्नाथडी ता.माजलगाव) असे मयत मजुराचे नाव आहे.

श्रीराम अण्णासाहेब कसबे असे या ऊसतोड मजूराचे नाव आहे. गावातील सोन्नाथडी येथील मुकादम अशोक बाबुराव कसबे यांची उचल या मजुराने घेतली होती. तर गंगाधर लक्ष्मण तिडके (रा. भोगलवाडी) हे ट्रक मालक होते. संबंधित मजुर हा मागील दहा ते पंधरा दिवसांपासून आजारी असल्याने ऊस तोडणीसाठी नकार देत होता. मात्र तरीदेखील मुकादम आणि ट्रक मालक दोघेही या मजुराला घेऊन निघाले होते. शुक्रवारी भोगलवाडीकडे येथून जात असताना काठेवाडी येथे आल्यावर श्रीराम कसबे यांनी ट्रक मधून उतरून पळ काढला.

मुकादम अशोक कसबे व गंगाराम तिडके यांनी ट्रकमधून उतरून मजुर कसबेचा पाठलाग करत शोधाशोध केली. नदीपात्राच्या परिसरात मजुर कसबे याला शोधून बेदम मारहाण केली. यावेळी मजुर गंभीर जखमी झाला. त्यामुळे माजलगाव येथे त्यावर उपचार करण्यासाठी नेत असताना कसबे या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याप्रकरणी मयत श्रीराम कसबे मजराी पत्नी सीताबाई कसबे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात मुकादम अशोक कसबे व ट्रक चालक गंगाधर तिडके यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघे आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय आटोळे करीत आहे.

Back to top button