जालना : भरधाव एसटी बसची दोन दुचाकींना धडक; दोघे ठार | पुढारी

जालना : भरधाव एसटी बसची दोन दुचाकींना धडक; दोघे ठार

सुखापुरी; पुढारी वृत्तसेवा : अंबडपासून सुमारे पाच किमी अंतरावर असणाऱ्या जालना- वडीगोद्री महामार्गावर रामनगर पाटीजवळ एका भरधाव एसटी बसने दोन दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. राजू भोईटे (वय ३२, रा. झिरपी, ता. अंबड), लक्ष्मण वसंत घांडगे (वय २०, रा. कासारवाडी, ता. अंबड) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर रोहिदास बर्डे, रा. सोनक पिंपळगाव, ता. अंबड व शिला भोईटे, रा. झिरपी, ता.अंबड हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले आहे.

बीड आगाराची निमआराम बस (एम.एच.२० बी.एल. ३६३२) अंबड येथून बीडकडे जात होती. रामनगर पाटीजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. याचवेळी मोटार सायकलवरून दोघेजण अंबडकडे जात होते. त्यांना बसने समोरून धडक दिली. त्यानंतर आणखी एका मोटार सायकलला बसने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. बसचा वेग जास्त असल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात जाऊन उलटली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस कर्मचारी दीपक पाटील, स्वप्नील भिसे, सतीश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button