Holi celebration in beed : विडा गावची धुळवड! गाढवावरून काढतात जावयाची धिंड | पुढारी

Holi celebration in beed : विडा गावची धुळवड! गाढवावरून काढतात जावयाची धिंड

केज; पुढारी वृत्तसेवा : जावई म्हटलं की, त्यांची सासरवाडीत मान सन्मान राखून मर्जी राखली जाते. जावयाच्या मर्जी प्रमाणेच सरबराई व पाहुणचार आणि मानमरातब दिला जातो. एक प्रकारे जावयाला सासरवाडीत तळहातावर घेतलं जातं; म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु केज तालुक्यातील विडा येथे धुळवडीला जावायाची चक्क गाढवावर बसवून मिरवणूक नव्हे तर धिंड काढली जाते. ही परंपरा जवळपास ९० ते ९५ वर्षांपासून गावानं जपली आहे. जशी ही परंपरा रंगतदार तशीच गंमतीशीर आहे. कधी काळी धुळवडीला सासुरवाडीला आलेल्या मेव्हण्याची थट्टा मस्करी करीत गाढवा वरून मिरवणूक काढली. ही घटना गावाची परंपरा बनली. जावयाला घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात येते. यात काही नवल नाही. परंतु जावयाला चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून डीजे व वाद्य वाजवून जल्लोषात धिंड काढली जाते. त्यात सर्व आबालवृद्ध सहभागी होतात. पुर्ण गाव त्यावर ठेका धरत वाजत गाजत मिरवणूक नव्हे तर चक्क धिंड काढली जाते. यावर विश्वास बसत नाही ना ? परंतु हे खरं असून जवळपास मागील ९० ते ९५ वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. यासाठी जावई ही ना .. ना .. करत राजी होतात. या परंपरेची सुरवात कशी झाली ? त्याचीही कथा गंमतीशीर आहे. (Holi celebration in beed)

यंदा धुळवडीला युवराज पटाईत यांचे जावई अविनाश करपे रा. जवळबन ता. केज हे गर्दभ स्वारीचे मानकरी ठरले. सकाळी धुळवडी निमित्ताने अविनाश करपे यांची गाढवा बसवून मिरवणूक काढली. यावेळी गावातील लहान, थोर , तरुणांनी डिजेच्या तालावर ठेका धरीत आनंद साजरा केला. ही मिरवणूक मंदिरावर गेल्यावर जावयाला मर्जी प्रमाणे व परंपरे प्रमाणे कपड्यांचा आहेर करून त्यांना सोन्याची अंगठी घातली. यावेळी पुर्ण गाव सहभागी होऊन आनंदात व रंगात चिंब भिजून गेला. (Holi celebration in beed)

काय आहे विड्याची गर्दभ स्वारीची परंपरा :- विडा हे गाव निजामशाहीतील जहागीरदारांचे गाव. अंदाजे सन १९१५ साली विड्याचे आनंदराव देशमुख यांचे मेहुणे हे धुळवडीला सासरवाडी म्हणजे विडा येथे आलेले होते. जहागीरदारांचे जावई म्हणजे त्यांचा रुबाब ही तसा काही औरच ! सासरवाडीत मेहुण्यांचा पाहूणचाराला ही जोड नाही. या दिवशी थट्टा मस्करीत मेहुण्याची चक्क गाढवर बसवून मिरवणूक काढली. ती परंपरा पुढे विडेकर गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे.

जस जशी धुळवड जवळ येईल तशी विड्यांच्या जवयांना धास्ती ! :- जसजसा फाल्गुन महिना उजडायला सुरुवात होते अन होळी जवळ येते तसे विड्याच्या जावयांच्या काळजात धडधड वाढू लागते अन गावातील घर जावई तर पसार होतात किंवा अनेकजण नॉट रीचेबल असतात.

जावयाच्या शोधात पथके होतात तैनात

गावची परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि गर्दभ स्वारीचा मानाचा जावई शोधण्यासाठी ग्रामस्थांची शोध पथके वेगवेगळ्या ठिकाणी जवयाच्या शोध मोहिमेवर निघतात अन एकदा का जावई हाती लागला की मग त्यांना कल्पना न देता त्यांना गाफील ठेवून मोहीम फत्ते केली जाते.

साप निघाल्याच्या खोट्या बनावाला अविनाश करपे फसले

होळीच्या रात्री एक पथक जवळबन येथे पोहोचले, पण अविनाश करपे यांना जाळ्यात कसे फसवावे याची एकाने शक्कल लढवली. साप निघाला म्हणून हाक मारली आणि अविनाश फसले अन घराबाहेर येताच त्यांना काहीजणांनी घेरले, त्यानंतर त्यांना घेऊन विडा गावात आणले.

आधी जरा वाईट वाटले पण सर्वांचा उत्साह आणि खेळकर पणा बघून आणि नंतर कपडे व अंगठी असा मानपान केलेला बघून आंनद वाटला.
-अविनाश करपे, गर्दभ स्वारीचे मानकरी जावई

 

हेही वाचा

Back to top button