छत्रपती संभाजीनगर : चोरीचे ट्रक स्क्रॅप करणाऱ्या टोळीप्रमुखाला पुण्यातून अटक | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : चोरीचे ट्रक स्क्रॅप करणाऱ्या टोळीप्रमुखाला पुण्यातून अटक

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून हायवा ट्रकची चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला पुणे येथील येरवडा जेलमधून पैठण पोलिसांनी ताब्यात घेतले. लक्ष्मण बाबुराव गाडे (रा. भिवंडी, बोडखा ता. अंबड, जि. जालना) असे टोळी प्रमुखाचे नाव आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हायवा ट्रक चोरून स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर ठोस कारवाई करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विधानसभेमध्ये २३ फेब्रुवारीरोजी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणावर हायवा ट्रक चोरून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा सूत्रधार असलेल्या लक्ष्मण बाबुराव गाडे या आरोपीवर नाशिक, जालना छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्याला अटक करून येरवडा तुरुंगात पाठविले होते.

दरम्यान, लक्ष्मण गाडे याच्यावर पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत ट्रॅक्टर चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पैठण पोलिसांनी गाडे याला येरवडा तुरुंगातून अटक केली.

हेही वाचा 

Back to top button