पुणे : छत्रपती संभाजीनगरच्या चंदन चोरट्याला बेड्या | पुढारी

पुणे : छत्रपती संभाजीनगरच्या चंदन चोरट्याला बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध ठिकाणी असलेली चंदनाची झाडे कापून नेत चोरी करणार्‍या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाला चंदननगर पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडील चौकशीत पुण्यात घडलेल्या चंदन चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत.

सद्दाम बेसमिल्हादु लोद (वय 34 रा. जंजाळा गाव, अंभाई ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पथकातील अधिकारी तपास करत असताना चंदन चोरी करणारी टोळी नदीपात्रालगत असलेल्या रिवाडीयल रोड येथे झुडपांमध्ये चंदनाचे झाड शोधत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या वेळी तत्काळ खात्री करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना पाहून ते पळू लागल्याने त्यातील सद्दाम लोद याला ताब्यात घेतले. त्याच्या कडील पोत्यात दोन चंदनाची खोडे जप्त करण्यात आली.

ही खोडे त्यांनी डिमोलो सर्व्हिस स्टेशन येथून चोरल्याचीही कबुली दिली. त्याच बरोबर वानवडी, चतुःश्रृंगी, येरवडा परिसरातून चोरी केल्याचे तपासात सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक निलेश घोरपडे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, अमंलदार सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकाळ, महेश नाणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button