बीड : जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश; दैनिक पुढारीने वेधले होते लक्ष | पुढारी

बीड : जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश; दैनिक पुढारीने वेधले होते लक्ष

बीड, पुढारी वृत्तसेवा : नेकनूर, लंपीच्या प्रादुर्भावाने चार महिन्यापासून बंद असलेले जनावरांचे बाजार सुरू नसल्याने परतलेल्या ऊसतोड मजुरांना बैल विक्रीसाठी फटका बसत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते. अखेर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश दिल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

लंपीमुळे मागच्या काही दिवसांपासून बंद असलेले जनावरांचे बाजार सुरू करण्याची मागणी शेतकरी व्यापाऱ्यातुन होत होती. कारखाने परंतु लागल्याने तर ऊसतोड मजुरांना बैल जोडी विकण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने फटका बसत होता. आमदार नमिता मुंदडा यांनीही बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. नेकनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

शनिवारी नेकनूर येथील भेटी दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांना नागरिकांनी निवेदन देत बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. पशुसंवर्धन उप-आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्याने बाजार सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून जनावराचे बाजार पुन्हा गजबाजणार असल्याने खरेदी विक्रीचा मार्ग सुकर होण्याबरोबरच अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button