

पैठण; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत बदली झालेले कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या संदर्भातील बातमी 'दैनिक पुढारी' मध्ये प्रकाशित झाली होती. याची दखल घेत औरंगाबाद विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश सोमवार (दि.२०) दिला आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु अनेक पोलीस ठाण्यांत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. यासंदर्भात दि.१२ फेब्रुवारी रोजी 'दैनिक पुढारी'मध्ये "बदली झालेले काही पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून" अशी बातमी प्रकाशीत झाली होती. यानंतर औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मलिकअर्जुन प्रसन्नकुमार, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या आदेशाने सोमवारी ग्रामीण पोलीस उप अधीक्षक पी.एच चौगुले यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
हेही वाचा :