औरंगाबाद : दोन महिन्यांच्या सेवेनंतर एसटीचा समृद्धीला टाटा; आता ही बस जुन्या मार्गावरून धावणार | पुढारी

औरंगाबाद : दोन महिन्यांच्या सेवेनंतर एसटीचा समृद्धीला टाटा; आता ही बस जुन्या मार्गावरून धावणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना अतिजलद आणि आरामदायी प्रवास करण्याची सुविधा एसटीने 15 डिसेंबरपासून सुरू केली होती. एसटीने एक बस समृद्धीवरून नागपूरला सोडली होती, परंतु पहिल्या दिवसापासून या बसला मिळालेला अल्प प्रतिसाद बघता ही बससेवा दोन महिन्यांच्या सेवेनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा शुक्रवार (दि. 17) पासून बंद करण्यात आली असून, ही बस जुन्या मार्गाने नियमित वेळेत धावणार असल्याची माहिती आगारप्रमुख अविनाश साखरे यांनी दिली.

औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून थेट नागपूर (जालना मार्गे ) ही बससेवा समृध्दी महामार्गावरून 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच या बसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तब्बल दोन महिन्यांच्या काळातही पहिल्या दिवसासारखाच अल्प प्रतिसाद मिळत असल्याने एसटी महामंडळाने ही बस शुक्रवार (दि.17) पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही बस नियमित वेळेत जुन्या मार्गावरून धावणार आहे.

नागपूरसाठी 110 रुपये तिकीट

समृध्दीवरून धावणाऱ्या बससाठी मोठ्यांना 1 हजार 100 रुपये व बालकांसाठी 550 रुपये भाडे आकारण्यात येत होते. आता ही बस जुन्या मार्गाने धावणार असल्यामुळे मोठ्यांसाठी 1 हजार 10 रुपये, तर छोंट्यांसाठी 505 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या बसमध्ये 45 प्रवासी आसन क्षमता आहे. यात 30 प्रवाशांची सीटिंग व्यवस्था तर 15 स्लीपरची व्यवस्था आहे.

हेही वाचा :

Back to top button