नगर : पाण्यावरून अधिकार्‍यांची खरडपट्टी | पुढारी

नगर : पाण्यावरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

नगर : पुढारी वृत्तसेवा : तीन महिने झाले प्रभागात दहा-दहा दिवस पाणी येत नाही. पाणी आले तरी पूर्ण दाबाने येत नाही. खुद्द मनपा अधिकार्‍यांच्याच घरी पाणी येत नाही. सामान्य नागरिकांची काय गत? असा सवाल उपस्थित करून सावेडी उपनगराचे नगरसेवक महासभेत आक्रमक झाले. भरसभेत नगरसेवकांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी करीत सभा चालू देणार नाही, असा इशारा दिला. अखेर सोमवारी (दि.20) महापौर, आयुक्त प्रभागाची पाहणी करतील असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवक शांत झाले.

महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची विशेष सभा शुक्रवारी झाली. व्यासपीठावर उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच पाणीप्रश्नावर गदरोळ सुरू झाला. सावेडी उपनगराच्या विस्कळीत झालेल्या पाणी प्रश्नासाठी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेविका दीपालीताई बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण आक्रमक झाले होते. आधी विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा आणि मग महासभेला सुरूवात करा. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सावेडी उपनगराचा पाणीप्रश्न विस्कळीत होऊन गंभीर बनला आहे.

नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. हा पाणी प्रश्न महापालिका प्रशासन कधी सोडवणार आहे. नगरसेवकांच्या घरी नागरिक हांडे घेऊन येत आहेत. अमृत पाणी योजना पूर्ण झाली आहे तर पाणी का येत नाही?, या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

पाणीपुरवठ्याचे उपअभियंता रोहिदास सातपुते यांनी जुजबी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. उपअभियंता गणेश गाडळकर यांनी अमृतपाणी योजनेचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. पाण्यासाठी अधिकार्‍यांना फोन केल्यानंतर ते उचलत नाही, असा आरोप महिला नगरसेवकांनी केला. दरम्यान, सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेची हद्द वाढ करण्यासाठी शासनाकडून डी.पी.युनिट मागविण्याला मान्यता देण्यात आली.

Back to top button