

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ही माहिती दिली.
या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील, असा दावा लोढा यांनी केला. या दरम्यान शिवनेरीकडे जाणार्या मार्गावर तीन दिवस टोलमाफी देण्यात आली आहे. किल्ल्याच्या पायथ्याजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'शिवकालीन गाव' हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच 'महाशिव आरती'चे आयोजन केले आहे.
18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर 7 ते रात्री 10 पर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, दुपारी 3 ते 5 शिववंदना, सायंकाळी 6 ते 7 महा शिवआरती, 7 ते रात्री 10 पर्यंत जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम होईल. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तीनही दिवशी विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन होणार आहे.