राज्यातील २८ हजार नादुरुस्त रोहित्र सव्वादोन महिन्यांत बदलले

राज्यातील २८ हजार नादुरुस्त रोहित्र सव्वादोन महिन्यांत बदलले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलून देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले होते. याची अमलबजावणी करण्यात आली असून सव्वादोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात तब्बल २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र बदलण्यात आल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

रब्बी हंगामात शेतपिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कृषीपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र ताबडतोब बदलण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून महावितरणला दिले होते. त्याप्रमाणे डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५, जानेवारीमध्ये ८ हजार ४०४ व ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र केवळ सव्वादोन महिन्यांच्या कालावधीत बदलले आहेत.
रोहित्र उपलब्ध

राज्यात कृषीपंपांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्र आहेत. सद्य:स्थितीत महावितरणकडे ऑईलसह सुस्थितीतील ४ हजार ३१२ रोहित्र उपलब्ध आहेत, तर राज्यात विविध ठिकाणी १९३४ कंत्रांटदार एजन्सीकडे आणखी ११ हजार ६५६ रोहित्रांची दुरुस्ती वेगाने सुरू आहे. त्यामुळे नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलून देण्यास कोणतीच अडचण नसल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

सर्वाधिक नादुरुस्त नाशकात

रोहित्रांच्या नादुरुस्तीत नाशिक परिमंडल आघाडीवर आहे. या परिमंडलात 4719 रोहित्र नादुरुस्त झाले होते, तर त्यापाठोपाठ बारामतीचा क्रमांक लागतो. या ठिकाणी 4086 रोहित्र नादुरुस्त झाले होते. राज्यातील इतर परिमंडलात औरंगाबाद परिमंडल- 1874, लातूर- 3548, नांदेड- 2893, अकोला- 3439, अमरावती- 1873, नागपूर- 203, गोंदिया- 621, चंद्रपूर- 460, , कोल्हापूर- 1414, पुणे- 586, जळगाव- 2403, , कल्याण- 98, कोकण-175 आणि भांडूप परिमंडलातील 38 रोहित्रांचा समावेश आहे.

नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी नवीन रोहित्राची वाहतूक व बदलण्याची कार्यवाही याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची आहे. त्यामुळे शेतकरी बांधव किंवा संबंधित वीजग्राहकांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करण्याची गरज नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news