बीड: प्रिय पालक… ; शिक्षकाने पालकांना लिहिलेल्या पत्राची चर्चा | पुढारी

बीड: प्रिय पालक... ; शिक्षकाने पालकांना लिहिलेल्या पत्राची चर्चा

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील एका शाळेच्या मुख्याध्यपकाने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पालकांना पत्र लिहिले. हे प्रेरणादायी पत्र समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल झाले आहे. पालकांना उद्देशून लिहीलेल्या या पत्राची चांगलीच चर्चा होत आहे.

या पत्रात सबंधित शिक्षकाने म्हटले आहे, प्रिय पालक… तुमच्या पाल्याची बोर्डाची परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण आपल्या पाल्याने परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी, यासाठी उत्सुक आहात. पण, कृपया लक्षात ठेवा, परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना 90 आणि 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेणे शक्य नसते. एखाद्या विद्यार्थ्याला लिखाणाची आवड असेल.. त्याचे एखाद्या नामांकित वर्तमान पत्रामध्ये संपादक व्हायचे ध्येय असेल. म्हणून त्याला गणित विषयाचा भागाकार, गुणाकार जमत नसेल.

एकाला कलाकार व्हायचे, असेल म्हणून कदाचित त्याला संगणक हा विषय अवघड जात असेल. एखाद्याला उद्योजक व्हायचे आहे. म्हणून त्याला सामाजिक शास्त्रातील भूगोल जमत नसेल. एखाद्याला संगीत विषयात गोडी असल्यामुळे त्याला विज्ञान विषयात कमी गुण मिळत असतील… एखादा विद्यार्थी मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात आला असेल, म्हणून त्याला इंग्रजीची भीती वाटत असेल. एखाद्याची शरीरयष्टी चांगली आहे आणि त्याला खेळामध्ये करिअर करायचे आहे म्हणून तो कदाचित केवळ 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होईल.

जर तुमच्या पाल्याला चांगले गुण मिळाले. तर ते खूपच छान आहे. परंतु जर तो किंवा ती तसे करू शकली नाही तर… कृपया त्यांच्याकडून त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा हिरावून घेऊ नका. त्यांना सांगा हे ठीक आहे, ही फक्त दहावी बारावीची एक परीक्षा आहे, आयुष्याची परीक्षा नाही! आयुष्यामध्ये अशा अनेक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करा. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या परीक्षेच्या गुणांवर नाही. तर त्यांच्यावर प्रेम करता, त्यांनी कितीही स्कोअर केला तरी तुम्ही निराश होणार नाहीत. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक चांगल्या- वाईट वेळेस तुम्ही त्यांच्या सोबत आहात याची त्यांना खात्री करून द्या.

तुमच्या पाल्याचे ध्येय त्याच्या आवडीनुसार असेल. तर जग जिंकण्यासाठी एक परीक्षा किंवा कमी मार्क त्यांची स्वप्ने प्रतिभा हिरावून घेणार नाहीत… असा मजकुर पत्रात लिहिला आहे. हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.

तुलना करू नका

एखाद्या नातेवाईकाचा किंवा शेजारचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर- इंजिनियर झाले. म्हणून माझ्याही पाल्याने जेईई किंवा नीटच करावी, असा अट्टाहास धरू नका. कोणत्याही विद्यार्थ्याशी आपल्या पाल्याची तुलना करू नका. कृपया एक लक्ष असू द्या. या जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपल्या कौशल्यानुसार करिअर करून यशस्वी होऊ शकतो. केवळ मेडिकल आणि इंजिनिअरींग मध्येच करिअर आहे. आणि तेच जगातील एकमेव आनंदी लोक आहेत, असे अजिबात नाही. कमी गुण घेतलेला तुमचा मुलगा भविष्यात अधिक गुण घेणारांना कामावर ठेवू शकतो, हे लक्षात राहू द्या, असे या पत्रात संबंधित मुख्याध्यपकाने म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button