केज, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या वादातून कोर्टात आलेल्या लहान भावाला लोखंडी गजाने मारहाण केली. यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना कोर्टाच्या आवारात घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या हल्लेखोरात वकिली व्यवसाय करणाऱ्या भावजईचाही समावेश आहे.
केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व संभाजी महादेव वायबसे या दोन सख्ख्या भावात शेतीच्या वादावरून केज कोर्टात भांडण सुरू आहे. दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वा च्या दरम्यान त्यांचे वकील नागरगोजे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी मोठा भाऊ संभाजी व त्याची बायको ॲड. सुरेखा त्यांचे सोबत लक्ष्मण किसन वायबसे (रा. कासारी), प्रमोद बाबुराव डोईफोडे, सखाराम बंसी कदम (रा. धर्माळा), सुदर्शन घुले, (रा. टाकळी) व तसेच दोन अनोळखी इसम हे रामहरी वायबसे यांच्या जवळ आले. त्यांना पाहून रामहरी वायबसे हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना या सर्वानी अडविले आणि मारहाण केली.
या मारहाणीत रामहरी वायबसे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात भाऊ संभाजी महादेव वायबसे, भावजई ॲड. सुरेखा संभाजी वायबसे आणि लक्ष्मण किसन वायबसे, प्रमोद बाबुराव डोईफोडे, सखाराम बन्सी कदम, सुदर्शन घुले आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.