बीड : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा भाजप-शिंदे गटात जाण्याविषयीचा खुलासा, म्हणाले… | पुढारी

बीड : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा भाजप-शिंदे गटात जाण्याविषयीचा खुलासा, म्हणाले...

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माझ्या मतदारसंघातील मतदार जर म्हणत असेल मी भाजपमध्ये जावे, तर मला विचार करावा लागेल. विरोधक मी भाजपमध्ये जाणार अशा चर्चा घडवून आणत असून माझी सर्वात जास्त चिंता ही भाजपमधील नेत्यांना आहे. मतदारांची इच्छा असेल तर भाजपच काय शिंदे गटात देखील जाऊ शकतो. मतदार संघातील जनतेला विचारूनच निर्णय घेईन व विचार करेन अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. हे राजकारण आहे. मला त्रास देण्याचा विरोधकांचा डाव आहे असे आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याच प्रश्नांवर आमदार सोळंके यांनी असे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केल्याने बीड जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. माजलगाव – मतदार संघातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी माजलगाव येथील परभणी फाट्यावर शुक्रवारी (दि. १७) रास्ता रोकोचे आयोजन केले आहे. या रास्ता रोकोची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके बोलत होते.

आमदार सोळंके म्हणाले, शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विंटल 10 हजार रू. भाव देवुन शासनाने खरेदी करावी, शेतकर्‍यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल 12 हजार रू भाव देवुन शासकीय खरेदी करावा. शेतकर्‍यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये. शेतकर्‍यांचे बँक खाते होल्ड केलेले सुरू करावीत. अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकर्‍यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत. यासह इतर मागण्यासाठी दि.17 फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मतदारसंघातील शेतकर्‍यांनी राजकीय जोडे बाजुला सोडुन सर्वपक्षीय, संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाश सोळंके यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे, खलील पटेल यांची उपस्थिती होती.
दरम्यान, जिल्ह्यात सुरु असलेल्या चर्चेवर बोलतांना आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार म्हणत असतील तर भाजप, शिंदे गटातही जाऊ असे म्हटल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Back to top button