पुढारी ऑनलाईन : भूकंपाच्या एक आठवड्यानंतर तुर्कीत सर्वत्र मृतदेहांची दुर्गंधी पसरसली असून बुधवारी तुर्की आणि सीरियात मिळून मृतांचा आकडा ४१ हजारवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे इमारतींच्या ढिगाऱ्यांखालून अजून लोकांचे आवाज येत आहेत.
मंगळवारी इमारतींच्या ढिगाऱ्याखालून १० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. भूकंपामुळे निवारा गमावलेल्या लोकांचे थंडी आणि अन्नपाण्याशिवाय मोठे हाल होत असून अशा लोकांच्या मदतीसाठी यंत्रणा अपुरी पडू लागलेली आहे.
बचाव पथकातील कर्मचारी सलाम अलदिन म्हणाले, "जे काही घडले आहे त्यावर विश्वास बसत नाही. इतके मृत्यू, इतके मृतदेह मी यापूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. संपूर्ण शहरातून मृतदेहांची दुर्गंधी पसरली आहे."
तुर्कीत भूकंपासंदर्भातील ताज्या घडमोडी खालील प्रमाणे आहेत
१. तुर्की आणि सीरियात मिळून मृतांची संख्या ४१ हजार इतकी झाली आहे. भूंकपात अनेकांचा निवारा हरपला असून कडक्याचा थंडीत लोकांचे मोठे हाल होत आहेत. भूकंपाच्या एका आठवड्यानंतर अजूनही इमारतींच्या ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज येत आहेत, असे CNNने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मंगळवारी दोघा भावांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे.
२. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोऑन यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. मानवी इतिहासातील एका मोठ्या आपत्तीचा आपण सामना करत आहोत, असे अर्दोऑन यांनी म्हटले आहे.
३. भूकंपातून बचावलेल्या मुलांत मानसिक विकार दिसू लागले आहेत.
४. सीरियात गेली १२ वर्षं अंतर्गत कलह सुरू आहे. या देशात परिस्थिती आणखी बिकट बनलेली आहे.
५. भारताने ऑपरेशन दोस्त या नावाने बचाव मोहीम सुरू केली आहे. तुर्की आणि सीरियात भारताने आतापर्यंत ७ कोटी रुपयांची मदत पोहोचवली आहे.
हेही वाचा