हिंगोली : आमदार प्रज्ञा सातव यांची सुरक्षा वाढवली | पुढारी

हिंगोली : आमदार प्रज्ञा सातव यांची सुरक्षा वाढवली

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिस दलाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. काल (गुरुवार) सकाळीच दोन पोलिस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. तर दुसरीकडे आरोपी महेंद्र डोंगरदिवे याची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कसबे धावंडा येथे आमदार डॉ. सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर आमदार डॉ. सातव यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुरुवारी पहाटे महेंद्र डोंगरदिवे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला गुरुवारी कळमनुरीच्या न्यायालया समोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी आमदार डॉ. सातव यांच्या सुरक्षेमध्ये तातडीने वाढ केली आहे. एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी तैनात केला आहे. या शिवाय गरज पडल्यास आणखी सुरक्षा वाढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आमदार डॉ. सातव यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी महेंद्र डोंगरदिवे याच्या आई वडिलांनी गुरुवारी कळमनुरी येथे जाऊन आमदार डॉ. सातव यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्हाभरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी महेंद्रचे आई वडिल भेटण्यासाठी आले होते किंवा नाही याची माहिती नसल्याचे सांगितले. पण या घटनेतून मी अद्यापही सावरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button