मृत्यूची सावली पाय पसरू लागली; पुढे आल्या मन हेलावणार्‍या कहाण्या

मृत्यूची सावली पाय पसरू लागली; पुढे आल्या मन हेलावणार्‍या कहाण्या
Published on
Updated on

दमास्कस, अंकारा; वृत्तसंस्था : तीन दिवस झाले, भूकंपाने तुर्की आणि सीरियाला उद्ध्वस्त करून. भूकंपातून वाचलेल्या, बेघर झालेल्यांची निसर्गही परीक्षा घेत आहे. बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचे जगणे असह्य होत आहे. कितीही मदतीचे हात आले, तरी ते अपुरे आहेत. ढिगार्‍यांखाली दबलेल्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. त्यातून पुढे येत आहेत पत्थराला पाझर फोडणार्‍या एकेक कहाण्या. जसजशी मृत्यूची सावली पाय पसरत आहे, तसतसे दु:खाचे डोंगर लाखो लोकांच्या उरावर कायमसाठी बसतील.

बापाच्या हातात मुलीचा हात, ती दबली आहे ढिगार्‍याखाली

तुर्कीमधल्या कहरामनमारस शहरात सगळीकडे कोसळलेल्या इमारतींचे ढीग आहेत. लोक आपल्या आप्तांचा शोध घेत आहेत. बचाव यंत्रणा तोकडी पडत असल्याने लोकच हाताने ढिगारे उपसून शोधाशोध करत आहेत. मेसूत हन्सर हा मध्यमवयीन गृहस्थ आपल्या अपार्टमेंटच्या अवशेषांतून मुलीला शोधत ढिगारे उपसत असताना त्याच्या हाती एक हात लागला. तो त्याच्याच मुलीचा. ती अजूनही बेडवरच आहे. हात थंड पडला आहे. काहीच हालचाल नाही. कारण तिच्या अंगावर अख्खा स्लॅब कोसळला आहे. मेसूत आपल्या 15 वर्षीय मुलीचा हात हाती घेऊन तिथेच बसला. बुलडोझर आणि बाकी साहित्य घेऊन मदत येईपर्यंत तो असाच बसून होता. अनेक तासांनी मदत आली. ढिगार्‍याखालून निघाला तो मेसूतच्या मुलीचा मृतदेहच.

72 तासांनंतरही तो वाचला; बाहेर आल्यावर विध्वंसाकडे पाहत सुन्न झाला

तुर्कीपेक्षा भीषण अवस्था आहे ती सीरियाची. व्हाईट हेल्मेट या संस्थेची पथके तीन दिवसांपासून तहानभूक हरपून मदतकार्यात गुंतली आहेत. या पथकाने जंदारीस या शहरात एका ढिगार्‍याखालून काही मृतदेह काढले. ढिगारे हलवताना कण्हण्याचा आवाज आला आणि सारेच सतर्क झाले. 72 तासांनंतरही एक जीव आत हुंकार भरत होता. महत्प्रयासाने ढिगार्‍याखाली अडकलेल्या 15 वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात यश आले. आपण वाचलो याचा आनंद त्या मुलाच्या चेहर्‍यावर होता; पण बाहेरचे द़ृश्य बघून तो सुन्नच झाला.

राहायला घर नाही, बाहेर थंडी; ग्रामीण भागात नागरिक बेहाल

तुर्कीच्या पाझारसिक शहरानजीकच्या ग्रामीण भागात आजही मदत पोहोचू शकलेली नाही. मदत आणि बचाव पथके सध्या शहरांतच केंद्रित आहेत, कारण मोठाल्या इमारतींखाली दबलेल्यांना काढण्याचे अशक्यप्राय काम हाती घेण्यात आले आहे. पाझारसिक शहरानजीकच्या ग्रामीण भागात एक ते दोन मजली घरांचीच संख्या अधिक आहे. कृषिप्रधान असलेल्या या भागातील बहुतांश घरे कोसळली आहेत. बाहेर मरणाची थंडी आहे, बर्फवृष्टीही होत आहे. पण अजून सरकारी मदत आलेली नाही. कुणी आपल्या कारमध्येच झोपत आहेत, तर काहींनी पडलेल्या घरांच्या अवशेषांचाच आडोसा करून आपला मुक्काम ठोकला आहे. मृतदेह काढण्याचा प्रयत्न नागरिकच करत आहेत. कदाचित काही जण जिवंत सापडतील या आशेपोटी.

ती जिवंत आहे, ढिगारे हटवेपर्यंत तिला जिवंत राहायला हवे!

इडलीब हे सीरियातील शहर. तेथे भूकंपाने भयंकर नुकसान केले. बचाव पथकांना मृतदेह आणि जिवंत माणसे शोधताना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. एका अपार्टमेंटच्या ढिगार्‍यात शोधकाम करतानला एक मुलगी जिवंत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. सिमेंटच्या दोन स्लॅबच्या सापटीत ती अडकल्याने वरचे हे अवजड अवशेष हटवल्याशिवाय तिला बाहेर काढणे अवघड आहे. मग व्हाईट हेल्मेट संस्थेच्या पथकाने तिला आधी श्वास घेणे सोपो व्हावे म्हणून ऑक्सिजन मास्क आणि ठराविक अंतराने तिला अन्न-पाणी दिले आहे. ती जिवंत आहे, ढिगारे हटवेपर्यंत तिने जिवंत राहायला हवे! असे या पथकाचे म्हणणे आहे. डोळे लागले आहेत ते बुलडोझर आणि कटर घेऊन पथक येण्याकडे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news