हिंगोली : दुचाकीसह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू | पुढारी

हिंगोली : दुचाकीसह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर शिवारात दुचाकीसह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता उघडकिस आली आहे. शेषराव कोंडीबा ठाकरे (वय ४८, रा. रामेश्वर) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

रामेश्वर येथील शेतकरी शेषराव ठाकरे यांचे रामेश्वर-दौडगाव मार्गावर रामेश्वर शिवारात शेत आहे. मंगळवारी रात्री ठाकरे हे शेतात विद्युत मोटार लावण्यासाठी दुचाकी वाहनावर शेतात जात होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन जमिनीलगत असलेल्या विहिरीत दुचाकीसह पडले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने याची माहिती कोणालाही लागली नाही. दरम्यान, शेषराव ठाकरे हे सकाळी घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. यानंतर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका दुसऱ्या शेतकर्‍याने विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार रवी इंगोले, रांजणेकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला असता सदर मृतदेह शेषराव ठाकरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी विहिरीच्या पाण्यातून दुचाकी बाहेर काढली. पोलिसांनी ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. ठाकरे यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button