हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत खडेश्वर बाबा मठात महंतांना पिस्तुलीचा धाक दाखवत लुटणार्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली. आरोपींकडून एक पिस्तुल, सोन्याचे दागिने, मोबाईल असा र्संमारे सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगत खडेश्वर बाबा मठातील महंत सुमेरपुरी महाराज यांच्या कानशिलावर पिस्तुल लाऊन सोन्याच्या अंगठ्या व इतर साहित्य पळविण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ओमसाई खरात, प्रदीप गायकवाड, अंकुश गायकवाड (रा. हिंगोली), कैलास देवकर (रा. गोरेगाव), राहुल घनवट (रा. साखरखेर्डा) यांना ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये अंकूश गायकवाड याने दरोडा टाकण्यासाठी ओमसाई खरात याच्याकडून पिस्तुल घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर यातील मुद्देमाल वाटून घेतल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून ३.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पिस्तुल व तीन जिवंत काडतुसांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, ज्ञानेश्वर पोकळे यांच्या पथकाने मागील चार दिवसांपासून माहिती घेण्यात सुरवात केली होती.
हेही वाचा :