मालमत्ता करवसुलीला अल्प प्रतिसाद; नगर परिषदेकडून केवळ 33.13 टक्के वसुली | पुढारी

मालमत्ता करवसुलीला अल्प प्रतिसाद; नगर परिषदेकडून केवळ 33.13 टक्के वसुली

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मालमत्ता कर वसुलीला अल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत अवघी 33.13 टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे प्रशासन वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे.

43 कोटी 24 लाख वसुलीचे उद्दिष्ट

चालू आर्थिक वर्षात करसंकलन विभागाकडून 43 कोटी 24 लाख 3 हजाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी अवघे 14 कोटी 32 लाख रुपये वसुली झाली आहे. त्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. तर, राहिलेल्या दोन महिन्यांत प्रशासनास 28 कोटी 91 लाख रुपये वसूल करावयाचे आहेत. तर, करसंकलन विभागाकडून वसुलीसाठीचे कागदावरील नियोजनाचे उत्तम आयोजन केले असल्याचे दिसत आहे.

764 मालमत्ताधारकांना नोटीस
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, करनिरीक्षक विजय शहाणे हे मात्र यावर्षी 100 टक्के वसुली करणारच, अशी ग्वाही वेळोवेळी देत आहेत. नगर परिषद हद्दीत एकूण 68 हजार 647 मालमत्ताधारक आहे. यापैकी अनेकांकडून मोठी थकबाकी आहे. आतापर्यंत कर संकलन विभागाकडून यासाठी 764 मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावलेले असून, 103 मालमत्ताना सील ठोकलेले आहे. करवसुलीसाठी 12 विभाग आणि दोन फिरती पथके वसुलीच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी रोजच पायपीट करत असताना दिसत आहेत.

Back to top button