जालना : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून | पुढारी

जालना : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून

भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथे बुधवारी (दि.१) रात्री घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संगीता अर्जुन सोनवणे (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून अर्जुन चांगु सोनवणे (वय 55) असे तिच्या पतीचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेडा मूर्तड येथील अर्जुन सोनवणे हे परिवारासह तालुक्यातील वरुड शिवारात राहत होते. अर्जुन याला दारूचे व्यसन असल्याने पत्नीसोबत नेहमी वाद होत असत. बुधवारी संगीता अंगणात गहू वाळवत असताना दारूच्या नशेत असलेल्या अर्जुनने तिच्यासोबत भांडण सुरू केले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने अर्जुनने तिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर अर्जुन घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत संगीता यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी नंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर आज (दि. २) सकाळी अर्जुनने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी भोकरदन पोलिसांत संगीता हिचा भाऊ संजय गावंडे याच्या फिर्यादीवरून  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटूंबरे करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button