पुणे : बिबट्याच्या हल्ल्याचा आणखी एक बळी ; महिलेला ओढत नेत खाल्ला गळ्याभोवतीचा काही भाग | पुढारी

पुणे : बिबट्याच्या हल्ल्याचा आणखी एक बळी ; महिलेला ओढत नेत खाल्ला गळ्याभोवतीचा काही भाग

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवारी (दि. १) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्या गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून वनविभाग अजून किती मृत्यूची वाट पहाणार अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद  करण्याची मागणी होत आहे.

मयत पुजा जालिंदर जाधव ही महिला टाकेवाडी कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव व दिर विश्वास बाळू जाधव असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंकेकरिता थांबले होते. त्यावेळी या महिलेच्या पती व दिराच्या समक्ष बिबट्याने हल्ला केला व शेजारील सुनील कुऱ्हाडे यांच्या शेतात पूजा यांना ओढत नेले. आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाचे शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.

या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी महेंद्र दाते आणि पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, माऊली ढोमे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी संपर्क साधला. माजी सभापती देवदत्त निकम, शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे अधिकारी यांनी मयत महिलेचे शवविच्छेदन शिरूर येथे करून नातेवाईक यांच्या ताब्यात दिले.

शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले असून मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या भागातील लोक जीव मुठीत धरून जीवन व्यतीत करत आहेत. जांबूत येथील तीन हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर आता पिंपरखेड येथेही बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने शासनाला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेट भागात मानवी हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडूनही वनविभागास जाग येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यापुढे बिबट्याकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर मृत व्यक्तीवर वनविभागाच्या कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करून वनविभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

                                         – माऊली ढोमे, अध्यक्ष, शेतकरी संघटना शिरुर.

Back to top button