बीड : राज ठाकरे परळी कोर्टात हजर; परळी न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

राज ठाकरे
राज ठाकरे
Published on
Updated on

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट परळी कोर्टाने आज (दि. १८) रद्द केले. सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. आज सकाळी राज ठाकरे स्वतः कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने पाचशे रुपयांचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती अ‍ॅड. अर्चित साखळकर यांनी दिली.

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखाल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिले होते. त्‍यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.

आज राज ठाकरे स्वतः परळी न्यायालयात हजर राहिले. कोरोना काळ, त्यानंतर झालेली सर्जरी, तब्येतीमुळे लांबचा प्रवास करण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयात हजर राहता आले नाही असा अर्ज ठाकरे यांच्याकडून वकिलांनी न्यायालयात दाखल करण्यात आला. यावरून कोर्टाने त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द केले. राज ठाकरे यांच्यासोबत मुंबईचे अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर, अ‍ॅड. अर्चित साखळकर, अ‍ॅड. अरुण लंबुगोळ पुणे तर परळी येथील हरिभाऊ गुट्टे हे होते.

गोपीनाथ गडावर नतमस्तक…. 

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावरील हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधी स्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर जाऊन पुष्पहार अर्पण केला व लोकनेत्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरेंचे परळीत जोरदार स्वागत, न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी 

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे परळी दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले. पांगरी येथील सरपंच सुशील कराड यांनी त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले. पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंच सुशील कराड यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी १० क्विंटल फुलांपासून बनवलेला ५० फुटांचा हार तयार केला होता. तसेच, जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

सुशील कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे गटाचे सरपंच आहेत. त्याचप्रमाणे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. न्यायालयीन कामकाजासाठी राज ठाकरे परळीत आले होते. ते न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने न्यायालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. न्यायालय परिसरात कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुरक्षा यंत्रणांना त्यासाठी खास खबरदारी घ्यावी लागली. न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news