शुभवार्ता : चाळिशीनंतर लग्न झाले तरी 1 लाख; गोवा सरकारकडून ‘लाडली लक्ष्मी’ योजनेत बदल | पुढारी

शुभवार्ता : चाळिशीनंतर लग्न झाले तरी 1 लाख; गोवा सरकारकडून ‘लाडली लक्ष्मी’ योजनेत बदल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : लाडली लक्ष्मीच्या अर्जदारांपैकी ज्यांची लग्ने झाली आहेत त्यांचे 1 लाख मानधन 31 मार्चपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी 40 वषार्ंनंतर लग्न झालेल्यांना या योजनेचा लाभ न देण्याचे सरकारचे धोरण होते; मात्र ते बदलून आता चाळीस वर्षांनंतरही लग्न करणार्‍या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

तारांकित प्रश्नाच्या वेळी हळदोण्याचे आमदार अ‍ॅड. कार्लोस फेरेरा यांनी या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. गृह आधार योजनेच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यावरही लवकर निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. आझादी का अमृत महोत्सव व गोवा मुक्ती हीरक महोत्सव अंतर्गत एकूण अकरा मुख्य कार्यक्रम झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, लोकांची कामे झालेली आहेत आणि एकूणच गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने विविध उपक्रमासाठी 29 कोटी 29 लाख रुपये खर्च केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रोजगार मेळाव्यामध्ये 557 जणांना रोजगार मिळाल्याचे सांगून विविध 35 खात्याचे अधिकारी सरकार तुमच्या दारी अंतर्गत गावागावात जात असल्याने लोकांची अनेक कामे होत असल्याचे ते म्हणाले.

कर्ज काढून सण

आमदार विजय सरदेसाई यांनीही सरकार कर्ज काढून सण साजरे करत असल्याचा आरोप केला. या प्रश्नावर बरीच वादावादी झाली. सरकारने 6450 कोटी कर्ज काढल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यावर सरकारला 8 हजार कोटी कर्ज काढण्याची मुभा आहे, तरी सरकारने तेवढे काढलेले नाही. तसेच सरकारने 20 वर्षांचे कर्ज फेडले, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या आरोपावर दिले.

कार्यक्रमांवर नाहक खर्च

लाडली लक्ष्मी व गृह आधारचे पैसे देण्यास सरकारकडे निधी नाही; मात्र इव्हेंटसाठी करोडो रुपये नाहक खर्च केले जातात, असा आरोप अ‍ॅड. फेरेरा यांनी केला होता. सरकारने गेल्या तीन वर्षांत राबवलेल्या कार्यक्रमांचा खर्च त्यांनी मागितला.

Back to top button