

वाशिम ; पुढारी वृत्तसेवा – दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ आज (मंगळवार) वाशिम शहरात बंदची हाक देण्यात आली. या बंदमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दरम्यान, पोलीस दलाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिह यांच्या वतीने सर्व समाज बांधवांना शांतत्तेचे व कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिसोड तालुक्यातील शिरपूर येथे एका गटाच्या विरुध्द दुसऱ्या गटाच्या युवकाने समाज माध्यम (इंन्स्टाग्राम) टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या. अशाप्रकारे दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वाशिम येथे आज कडकडीत बंद व निषेध मोर्चाचे आवाहन सर्वसमाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी (१४ जानेवारी) एका समाजकंटकाने इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमातून एका विशिष्ट गटाची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केली होती. या घटनेचा निषेध आणि संबधीत व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शिरपूर, मालेगाव, रिसोड शहरात बंद पाळण्यात आला.आज वाशिम शहरातही बंदची हाक देण्यात आली आहे.
हेही वाचा :