सुरत-हैद्राबाद महामार्ग मोजणीला विरोध; जमिनीचा संपूर्ण मोबदला देण्याची शेतकर्‍यांची मागणी | पुढारी

सुरत-हैद्राबाद महामार्ग मोजणीला विरोध; जमिनीचा संपूर्ण मोबदला देण्याची शेतकर्‍यांची मागणी

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : सुरत- हैदराबाद या एक्सप्रेस ग्रीन हायवेसाठी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी विरोध केला. आमच्याशी वरिष्ठ अधिकार्‍यांनी चर्चा केल्याशिवाय मोजणी होऊ दिली जाणार नाही, असा इशारा आंदोलन शेतकर्‍यांनी दिला. तालुक्यातील काही गावांमध्ये सुरत हैदराबादची एक्सप्रेस ग्रीन हायवे ची मोजणी सुरू झाली असली तरी खडांबा, सडे परिसरात शेतकरी विरोध करीत आहेत. काल संपादित जमिनीची मोजणी करण्यासाठी मंडलाधिकारी दत्ता गोसावी, कामगार तलाठी कदम आलेले होते. भूसंपादन करावयाच्या शेतकर्‍यांना याबाबतच्या नोटिसा महसूल विभागांने बजावलेल्या होत्या. त्यानुसार दीडशे ते दोनशे शेतकरी खडांबे येथे हजर होते.

आंदोलकांसमोर बाबासाहेब धोंडे म्हणाले की, या परिसरातील शेतकर्‍यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या आहेत. तसेच मुळा धरण, इंडियन ऑईल प्रकल्प यासाठी देखील शेतकर्‍यांनी जमिनी दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण पुर्नवसन बाबतीत अनेक परीपत्रके निघाली. मात्र पुणेपणे अंमलबजावणी झाली नाही. आमच्या जमिनीचा प्रत्यक्ष मोबदला आम्हाला किती मिळणार? हे स्पष्ट सांगितल्याशिवाय आम्ही जमीन मोजणी होऊ देणार नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एकत्रित बैठक शासकीय कार्यालयात घेतली जावी. अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी केली.

विद्यापीठासाठी 76 एकर जमीन संपादित केली गेली व एका दिवसात आपण भूमिहीन झाल्याचे सांगितले. स्पॉट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी जमिनी देणार नाहीत.

                                                दौलतराव पवार, शेतकरी

Back to top button