परभणी : डॉ. विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत रंगणार ‘जिंतूर रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा | पुढारी

परभणी : डॉ. विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत रंगणार 'जिंतूर रत्न' पुरस्कार वितरण सोहळा

जिंतूर(परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : जिंतूरच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी, जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दिले जाणारे ‘जिंतूर रत्न’ आणि ‘जिंतूर युवारत्न’ पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा प्लास्टिक सर्जन व सुप्रसिद्ध वक्ते डॉ. विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत दि. 8 जानेवारी 2023 रविवार सकाळी 11 वाजता जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल लहाने हे ‘एका संधीची गोष्ट’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून 2022 वर्षाचा ‘जिंतूर रत्न’ पुरस्कार ज्याचे स्वरूप 11001 रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून तो गॅंगमनकार, प्रा. सदानंद पुंडगे यांना जाहीर झाला आहे आणि ‘जिंतूर युवारत्न’ पुरस्कार ज्याचे स्वरूप रु. 5001/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून तो प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, प्रताप जगताप (देशमुख) यांना जाहीर झाला आहे.

पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ‘एका संधीची गोष्ट’ ऐकण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुनिल शिवाजीराव बुधवंत, उपाध्यक्ष बलराम श्यामसुंदर सोनी व सचिव स्नेहा शिवाजीराव काकड यांनी केले आहे.

जिंतूर रत्न पुरस्कारांचे तिसरे वर्ष

जिंतूर रत्न पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी पुरस्कारांसाठी तब्बल 52 नावे सुचविण्यात आली होती. दरवर्षी ‘जिंतूर रत्न’ आणि ‘जिंतूर युवारत्न’ असे दोनच पुरस्कार देण्यात येतात. जिंतूर बद्दलच्या ममत्वाने तसेच कर्तव्य भावनेने आणि अगत्यापोटी जिंतूरच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कृत केले जात. काम करत राहूनही अपरिचित राहणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापर्यंत पोहोचवावे या वृत्तीने तसेच सद्भावनांची आणि सद्गुणांची कदर व्हावी या भावनेने हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. पुरस्कार देण्यासाठीची प्रेरणा ही जिंतूरच्या मातीचीच होती, असे ॲड. सुनील बुधवंत म्‍हणाले.

.हेही वाचा 

मुंबई : दोन माजी महापौरांसह शिवसेनेचे डझनभर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

देशात आता विदेशी विद्यापीठे; विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवी नियमावली जाहीर

Back to top button