नांदेड : समाधानकारक दर न मिळाल्यास बेमुदत बंद; फूल उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा | पुढारी

नांदेड : समाधानकारक दर न मिळाल्यास बेमुदत बंद; फूल उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : मुदखेड शहरासह तालुक्यातील व अर्धापूर, उमरी, भोकर परिसरातील शेतकऱ्यांनी फूल व्यापाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून काकडा फुले न तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही शेतकरी काकडा तोडून फेकून टाकत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी काकडा न तोडण्याचा निर्णय घेत फूल व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी आपले आंदोलन हे येणारे पाच दिवस म्हणजे ९ जानेवारीपर्यंत सुरु राहील असे सांगितले आहे.

मुदखेड शहर व तालुका भरात फुलांचे उत्पादन घेण्यात सदैव अग्रेसर आहे. या तालुक्यातील शेतकरी तसेच शेजारील तालुके अर्धापूर भोकर व उमरी या भागातील शेतकऱ्यांच्या फुलांना दररोज दर कमी मिळतो. त्यामूळे फुले तोडणे जिकिरीचे  बनले आहे. व्यापाऱ्यांच्या एकजुटीला शेतकऱ्यांनी विरोध करत शेतकऱ्यांची एकी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, मागील दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांनी बैठका घेऊन आपल्या शेतातील फुले बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्यांना देणार नाहीत असा निर्धार केला आहे.

फुले तोडणारच नाही

मुदखेड तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांच्या शेतातून दररोज जवळपास  १५ टन काकडा फुले नांदेड, हैदराबाद, निजामाबाद, बंगळूर, विजयवाडा, गुंटूर, संभाजीनगर, मुंबई, नागपूर, अमरावती आदी भागात विक्रीसाठी जातात.  शेतकऱ्यांकडून फुले तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या मजुरांना काही भागात ६० रुपये तर काही भागात ७० रुपये किलो प्रमाणे मजुरी देण्यात येते. पौष महिन्याचे कारण सांगत या शेतकऱ्यांच्या काकडा फुलांना बाजारात मागणी नसल्याचे कारण सांगितले जाते. ४०/५० रुपये प्रति किलो अशा दराने विक्री करण्यात येत आहे. व्यापारी कमिशनही शेकडा दहा टक्के दराने घेतात. कमीत कमी २५ रुपयाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या दोन आठवड्यापासून बैठका घेतल्या. बैठकीत ठरल्याप्रमाणे ५ जानेवारी ते दिनांक ९ जानेवारीपर्यंत काकडा फुले तोडणारच नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात आले आहे.

तर मार्केटला फुलांना मागणीच नसल्यामुळे आम्ही भाव कसा द्यावा? अशा प्रतिक्रिया फुलं व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. गतवर्षी पाहता पौष महिन्यामध्ये काकडा फुलांना बऱ्यापैकी मागणी असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. परंतू यंदाच्या पौष महिन्यात फुलांना दर का नाहीत? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पदरी निराशाच पडलेली असल्याने शेतकऱ्यांना एकी दाखवण्याची वेळ हीच असून व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला मोडून काढण्यासाठी फूल तोडणी बंद केली असून समाधानकारक दर न मिळाल्यास बेमुदत बंद करणार असल्याचे सांगितलं आहे.

हेही वाचा

Back to top button