हिंगोली : उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार | पुढारी

हिंगोली : उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले, असा आरोप करत शेतकऱ्याने थेट गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत शेतकऱ्याने म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही वीज कंपनीने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे वीज पुरवठ्याबाबत खोटे बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर किंवा वीज पुरवठा खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. सेनगाव तालुक्यातील माझोड येथील शेतकरी दशरथ गजाजन मुळे यांनी ही तक्रार दिली आहे.

तक्रारीसंदर्भात शेतकरी दशरथ मुळे यांनी सांगितले की, त्यांचे 1.25 एकर शेत आहे. या शेतात भाजीपाला घेतला जातो. त्यांच्याकडे शेतीपंपाच्या वीज जोडणीचे देयक थकीत नाही. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 नोव्हेंबर रोजी शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये, अशा स्पष्ट सूचना वीज कंपनीला दिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी 30 नोव्हेंबर रोजी 10 हजार रुपये खर्चुन गोबीची रोपे आणली होती. मात्र वीज कंपनीने त्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा 2 डिसेंबर रोजी खंडीत केला.

शेतकरी दशरथ मुळे यांनी सांगितले की, वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर या प्रकरणी त्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वीज देयक थकीत नसतांना वीज पुरवठा का खंडीत केला? याची विचारणा केली. त्यानंतर काही दिवसानंतर वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र तोपर्यंत गोबी पिकांची रोपे वाळून नुकसान झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे आदेश दिले असतानाही वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून एक तर उपमुख्यमंत्री खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोरेगाव पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली असल्याचे शेतकरी दशरथ मुळे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button