औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्गावर चाकूहल्ला करून चौघांना लुटले | पुढारी

औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्गावर चाकूहल्ला करून चौघांना लुटले

कन्नड ; पुढारी वृत्‍तसेवा – कन्नडहून शिवूरकडे  कारने जाणार्‍या चौघांवर चोरट्यांनी चाकूहल्ला केला. त्‍यांच्याकडील २१ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्‍ट्रीय महामार्गावर
चाकूहल्‍ला करून लुटमार झाल्‍याच्या घटनेने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अमोल घायवट ( रा. शिवूर, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार, घायवट यांच्‍यासह वाल्मिक जाधव, रामनाथ जाधव व नितीन श्रीवास्तव असे चौघेजण कारने कन्नडहून शिवूरकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर सेवा हॉटेलजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्‍यांनी लघुशंका करण्यासाठी गाडी थांबवली. या वेळी अचानक अनोळखी व्‍यक्‍तीने चालक बाजूच्या काचेवर मोठा दगड मारला. काच फोडली. ही व्‍यक्‍ती मनोरुग्ण  असावी, असा समज करुन सर्वांनी त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष केले. मात्र कारचा दरवाजा उघडताच चार चोरटे कारजवळ आले. त्यांच्या हातात चाकू व सुरे होते. कारच्या मागच्या सीटवर बसलेले वाल्मिक जाधव त्‍यांच्‍यावर चाकू हल्ला केला. तसेच चालक सीटवर बसलेले रामनाथ जाधव यांच्यावर सुद्धा हातावर, पोटावर, आणि मांडीवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले.

यानंतर चोरट्यांनी रामनाथ जाधव यांच्या खिशातील ११ हजार, अमोल घायवट यांच्या जवळीक ९ हजार तर  वाल्मिक जाधव यांच्या जवळचे एक हजार रुपये काढून घेतले. घायवट यांनी जखमीना कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्‍यानंतर जखमींना शहरातील खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button