शाळा सुरू करण्यासाठी महापुरूषांनी भीक मागितली; चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान | पुढारी

शाळा सुरू करण्यासाठी महापुरूषांनी भीक मागितली; चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात आहे. यामध्ये आता राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापुरूषांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर कशामुळे अवलंबून राहता, असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. औरंगाबाद पैठण संतपीठच्या कार्यक्रमात ते बोलत असताना पाटील यांनी हे विधान केले आहे. भारतात शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करण्यासाठी शासकीय अनुदान मिळाले नाही. यासाठी त्यांनी भीक मागितली, असे पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियातून आणि विरोधी पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्यांकडून गेल्या आठ दिवसांत महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे. आता चंद्रकांत पाटील यांची यात भर पडली आहे. महापुरूषांनी लोकवर्गणीतून शाळा आणि शिक्षण संस्था उभ्या केल्या. आता भाजप नेत्यांची मस्तकातील घाण साफ करण्यासाठी गाडगे महाराजांचा झाडू हाती घ्यावा लागेल, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button